- पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रशासनाला सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या मॅपिंगचे काम तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रगती आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मॅपिंग प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून उर्वरित कामे एका आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. पुढील रविवारी पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून त्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने किमान ७५ टक्के मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवावा, अशीही सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, कँटोन्मेंट बोर्ड, जेएनएमसी आणि वनविभागाच्या वसाहतींमधील मतदान केंद्रांच्या मॅपिंगसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मॅपिंग प्रक्रियेतून कोणताही मतदार वगळला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारकडून एक टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास ग्रामपंचायतींच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. या बैठकीस पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








