बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील जाफरवाडी येथे मंगळवारी रात्री एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल प्रकाश पाटील (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कोमल हिचे लग्न होऊन पाच वर्षांचा काळ लोटला होता. तिला एक मुलगाही आहे. तिचे माहेर कंग्राळी खुर्द असून सासरी ती जाफरवाडीत राहत होती. मंगळवारी ती वडगाव येथे काकूकडे जाण्याचा हट्ट धरत होती. मात्र पतीने व्यवसायाच्या कारणास्तव सध्या व्यस्त असल्याचे सांगितले. या किरकोळ कारणावरून कोमलने रागाच्या भरात आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे करीत आहेत. कोमलच्या मृत्यूमुळे तिच्या पतीसह दोन लहान मुले, सासू-सासरे, आई-वडील व अन्य नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.