- तब्बल तीन दिवसानंतर शोधमोहीम यशस्वी
- अलतगा पुलाजवळ आढळला मृतदेह
बेळगाव / प्रतिनिधी
शनिवारी सकाळी दारूच्या नशेत कंग्राळी खुर्द पासून काही अंतरावर असलेल्या मार्कंडेय नदीत उडी घेतलेल्या सचिन माने (वय ४५ रा. महादेव रोड कंग्राळी खुर्द , मूळ सोलापूर, महाराष्ट्र) या युवकाचा मृतदेह अखेर सापडला. तब्बल तीन दिवसानंतर आज मंगळवारी सकाळी अलतगा पुलाजवळ मृतदेह आढळून आला.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सचिन माने हा मूळचा सोलापूर (महाराष्ट्र) येथील असून गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी व एक मुलगा व मुलगी यांच्यासह तो कंग्राळी खुर्द येथे राहत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो सुतार काम करायचा. शनिवारी सकाळी सचिनने सोलापूरला राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल केला. आधी तो कॉल करून मोठ्या मोठ्याने ओरडत होता. त्यांना काहीतरी सांगत होता. त्यानंतर त्याने मी जीव देतो असे म्हणत हातात मोबाईल घेऊनच उडी मारली होती.
दरम्यान सचिनला उडी मारताना पाहिलेल्या युवकांनी त्याच्या कुटुंबीयांना संपर्क साधला तसेच एपीएमसी पोलीस स्थानक अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि एचईआरएफ या यंत्रणांना माहिती दिली होती. हा भाग एपीएमसी व काकती या दोन्ही पोलीस स्थानकांच्या हद्दीत येत असल्याने दोन्ही ठिकाणचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून नदीत बोटी व कॅमेऱ्याच्या साह्याने शोध कार्य सुरू केले होते. पण नदीत वाढलेली झुडुपे, चिखल, प्लास्टिक, शेतीत वापरून टाकलेले मल्चिंग पेपर यामुळे शोधकार्यात अडचण येत होती. एचईआरएफचे बसवराज हिरेमठ, राजू टक्केकर, एसडीआरएफचे शिवानंद हणमण्णावर, रविंद्र अप्पय्यण्णावर, गंगापा उडकेरी, सिराज मोकाशी, बसवराज मणगेरी व सहकारी तसेच अग्नीशमन विभागाचे किरण पाटील, नजीर पैलवान, केदारी मालगार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. नदीकाठावर बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. बोटीच्या सहाय्याने शोध केला. मात्र नदी दुथडी भरुन वाहत असल्याने सचिनचा शोध लागला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली.
यानंतर मंगळवार दि. २२ जुलै रोजी सकाळी ८.३० पासून, बसवराज हिरेमठ आणि रिमोट ऑपरेशन प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली टीमने ब्रिजच्या आतल्या बाजूस पुन्हा तपासणी सुरू केली. त्याच दरम्यान, एसडीआरएफ टीमला नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. ही माहिती मिळताच एचईआरएफ टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.