• हिंडलगा येथे स्वच्छता मोहीम
  • पर्यावरण जनजागृतीलाही चालना

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील मार्कंडेय नदीच्या संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना तसेच ‘मार्कंडेय वाचवा’ पथकाने पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. मण्णूर–आंबेवाडी मार्गावरील हिंडलगा पंप हाऊसजवळ रविवारी पार पडलेल्या या उपक्रमाला पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नद्यांचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

या अभियानाचे नेतृत्व कृष्ण हित्तलमनी यांनी केले असून समाजसेवक आकाश हलगेकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांनी नदीपात्रात साचलेला प्लास्टिक कचरा आणि इतर घनकचरा स्वतः गोळा करून बाहेर काढत परिसर स्वच्छ केला. यासोबतच नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या श्रमदान मोहिमेत काशिनाथ कोप्पद, देवयानी पाटील, प्रवीण देवरमणी, प्रताप कांबळे, बावकण्णा पिरगणे, शंकर कांबळे, गजानन मंत्री, श्वेता कोटियान, सानिका तेरसे यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते. भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबवून नदी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे कृष्ण हित्तलमनी यांनी सांगितले.