हिंडलगा / वार्ताहर
मण्णूर – आंबेवाडी या मुख्य मार्गावर असणाऱ्या मार्कंडेय नदी पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. या ठिकाणी कचरा, प्लास्टिक, टाकाऊ वस्तु देवदेवतांचे फोटो, रक्षाविसर्जन करून राहिलेले साहित्य यांचा खच पडून गेला होता. येथून दुचाकी, चारचाकी, पादचारी मोठ्या संख्येने जात येत असतात. परंतु सर्व यांकडे दुर्लक्ष करून जात येत होते. या अस्वच्छतेची दखल मण्णूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेऊन रविवार दि.३ रोजी स्वच्छता मोहीम राबविली.
या स्वच्छता मोहिमेत महेश डोणकरी, उमेश चौगुले, संदीप कदम, संजय आनंदाचे, नारायण मंडोळकर, मल्लू कडोलकर, भरमा चौगुले व पवार सर या सर्वांनी हातात फावडा बुट्टी घेऊन सर्व परिसर स्वच्छ केला. तसेच भग्न देवदेवतांचे फोटो सन्मानपूर्वक काढले.
यामध्ये जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी आपल्या घरातील देवदेवतांचे फोटो व इतर पूजनाचे साहित्य मोठ्या प्रमाणात टाकले होते. हा सर्व परिसर स्वच्छ केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे भान सर्वांनीच ठेवून नदीकाठचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशाप्रकारचे आवाहन या सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. यापुढे तरी या नदीकाठाच्या भागात अशाप्रकारे घाणीचे साम्राज्य करू नये. अवघ्या वीस दिवसानंतर गणेशमूर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी केले जाते. याचे भान ठेवून जनतेने सहकार्य करावे, असेही आवाहन केले आहे.