बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा दुपारी ३ वाजता राजहंसगड येथून प्रारंभ होणार असून विविध गावांतून मार्गक्रमण करत सायंकाळी येळ्ळूर येथे जाहीर सभेने तिचा समारोप होणार आहे.

यात्रा राजहंसगड, सुळगे (ये), येळ्ळूर, अवचारहट्टी मार्गे धामणे येथे जाऊन पुन्हा त्याच मार्गाने परत येळ्ळूर गावात फेरी काढेल. सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला स्वर्गीय शिवसेना नेते आनंद दिघे यांचे निकटवर्तीय आणि १२ वर्षे त्यांची निष्ठेने सेवा केलेले शिवसैनिक नंदकुमार गोरुले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले गोरुले हे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, दिग्दर्शक, कवी व कलाकार म्हणून परिचित आहेत. धर्मवीर या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेते अभिनेते प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या जीवनाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती गोरुले यांच्याकडून घेतल्याचा उल्लेख आपल्या मुलाखतीत केला होता.

बेळगाव सीमाभागाशी गोरुले यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सीमावासीयांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने करण्यात आले आहे.