- कन्नड संघटनांच्या कृतींविरोधात मध्यवर्ती म. ए. समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
शहरात अलीकडेच काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्यांच्या मराठी आणि इंग्रजी फलकांवर हस्तक्षेप केल्याच्या घटना वाढल्या आहेत. फलक झाकणे, काळे रंगवणे किंवा काढून टाकण्यासारख्या बेकायदेशीर कृती रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शहर पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनावर माजी आमदार व कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस व माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्यासह खानापूर अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी स्वाक्षरी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून काही कार्यकर्ते कायदा हातात घेऊन व्यापारी प्रतिष्ठानांचे फलक बेकायदेशीरपणे पुसत आहेत, ज्यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. कायदेशीर व्यवसाय चालविणाऱ्या व्यापाऱ्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेला व्यवसाय स्वातंत्र्याचा हक्क आहे.
तसेच, कन्नड भाषा सर्वांगीण विकास अधिनियम २०२२ नुसार सरकारी आणि स्थानिक संस्थांच्या फलकांवर कन्नड भाषा अनिवार्य असली, तरी मराठी किंवा इंग्रजीचा वापर करण्यावर कोणतीही बंदी नाही, हेही समितीने स्पष्ट केले. त्यामुळे व्यापारी फलकांवरून मराठी व इंग्रजी मजकूर हटविण्याचा अधिकार कोणत्याही सामाजिक संघटनेला किंवा व्यक्तीला नाही, असे नमूद करण्यात आले.
मराठी फलकांवर केले जाणारे हे प्रकार स्थानिक भाषिकांच्या भावना दुखावणारे असून अल्पसंख्यांक भाषेच्या संवैधानिक हक्कांवर गदा आणणारे आहेत, असेही समितीने म्हटले आहे.
या निवेदनावेळी समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात रणजीत चव्हाण पाटील, दत्ता उघाडे, रणजीत हावळणाचे, आर. एम. चौगुले, पियूष हावळ, महेश जुवेकर, अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, गोपाळ पाटील, श्रीकांत कदम, बी. डी. मोहनगेकर, उमेश पाटील, विनायक कावळे, किरण हुद्दार, नेताजी जाधव आदींचा समावेश होता.








