• काळा दिनाच्या निषेध फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी ; जोरदार घोषणाबाजी

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारून हजारो मराठी भाषिकांनी काळा दिनाच्या निषेध फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा वज्रनिर्धार केला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काळा दिनाच्या फेरीत आबालवृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांनीही सहभागी होऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी चौथी पिढीही सज्ज असल्याचे दाखवून दिले. फेरीमध्ये हजारो मराठी भाषक सहभागी झाल्यामुळे सर्वत्र मराठी भाषकांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला. युवा पिढीत महाराष्ट्रात जाण्यासाठीची जिद्दही दिसून येत होती.

भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर करून घेण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निषेध फेरीचे आयोजन करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून काळा दिनाच्या निषेध फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते धर्मवीर संभाजी उद्यानात दाखल होण्यास सुरुवात झाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास फेरीला सुरुवात करण्यात आली. निषेध फेरीच्या अग्रभागी महिला होत्या. त्यानंतर कार्यकर्ते व युवावर्ग संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत निषेध करीत सहभागी झाला. चोन्नद स्टील, महाद्वार रोड, गजाननराव भातकांडे शाळा, एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, अंबाभुवन रोड, शिवाजी रोड, शेरी गल्ली कॉर्नर, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया कॉर्नर, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कलमार्गे मराठा मंदिर येथे फेरीची सांगता करण्यात आली. फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. फेरी महात्मा फुले रोड येथे पोहोचल्यानंतर पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसाची तमा न बाळगता कार्यकर्ते मिरवणुकीची सांगता होईपर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत होते. काही ठिकाणी निषेध फेरी घेऊन जाण्याबाबत पोलिसांनी कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीला न घाबरता फेरीच्या मार्गावरून अत्यंत शांततेने सहभाग घेतला. त्यामुळे फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

फेरीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, नेताजी जाधव, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. अमर येळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, विजय भोसले, राकेश पलंगे, माजी महापौर सरिता पाटील, आप्पासाहेब पुजारी, रेणू किल्लेकर, सुनील बाळेकुंद्री, महेश जुवेकर,आर. के. पाटील, रावजी पाटील, प्रकाश अष्टेकर, दुधाप्पा बागेवाडी, आर. आय. पाटील, वैशाली भातकांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरोळकर, बंडू केरवाडकर, मदन बामणे, सचिन गोरले, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, सुधा भातकांडे, वैशाली भातकांडे, शिवानी पाटील, बी. डी. मोहनगेकर, अमित देसाई, राजू पावले, किरण हुद्दार, महादेव मंगनाकर, शिवाजी पट्टण, अनिल हेगडे, सिद्धार्थ चौगुले, शिवाजी हावळाणाचे, नागेश बोबाटे, राजू तुडयेकर, किरण गावडे, पुंडलिक चव्हाण, किरण बडवाणाचे, मोतेश बार्देसकर, शांताराम होसूरकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, विजय हलगेकर, डी. बी. पाटील, सागर पाटील, उमेश पाटील, गुणवंत पाटील, अनिल अमरोळे, बाबू कोले, सुरेश रेडेकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

  • क्षणचित्रे :
  • साडेआठ वाजल्यापासून संभाजी चौकात कार्यकर्ते येण्यास सुरू
  • दडपशाही करण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांची कुमक तैनात
  • काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करून कार्यकर्ते सहभागी महिला आणि तरुणींचाही मोठा सहभाग
  • फेरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याचे वाटप
  • निषेध फेरी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी
  • संयुक्त महाराष्ट्रसह केंद्राविरोधात घोषणाबाजी
  • फेरीवेळी महात्मा फुले रोड परिसरात पावसाची हजेरी
  • निषेध फेरीत घुसण्याचा कन्नड संघटनांचा प्रयत्न
  • युवकांचा सहभाग उत्साह वाढविणारा

  • दडपशाही धुडकावून कार्यकर्त्यांचा सहभाग :

काळा दिनाच्या फेरीत सहभागी होण्यासाठी भालकी, निपाणी व खानापूर तालुक्यांच्या विविध भागांतील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने बेळगावात दाखल झाले होते. या कार्यकर्त्यांनीही निषेध फेरीत सहभागी होऊन सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत अखंडपणे लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात होती, तरीही कार्यकर्ते विविध मार्गानि फेरीत सहभागी होत होते. त्यामुळे पोलिसांची दडपशाही कार्यकर्त्यांनी धुडकावून लावल्याचे चित्र शहराच्या अनेक भागांत पाहावयास मिळत होते.