बेळगाव : “मराठी भाषेला दीर्घ आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, हेमाद्री पंडित, चक्रधर स्वामी, सावता माळी, संत तुकाराम, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोरोपंत आणि श्रीधर स्वामी यांसारख्या अनेक थोर व्यक्तींनी केलेल्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.” असे बजरंग धामणेकर म्हणाले.
बाल शिवाजी वाचनालयात आयोजित “अभिजात मराठी भाषा” सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी “मराठी भाषेचा प्रवास” या विषयावर बोलताना धामनेकर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, “भाषा टिकवण्यासाठी अनेकांनी त्याग केला आहे. ज्ञानेश्वर माऊलीपासून आजपर्यंत मराठी भाषेच्या उन्नतीसाठी कोणीही कमी पडले नाही. मराठी भाषा सर्वसमावेशक असून विविध क्षेत्रांना व्यापणारी आहे. तिच्या उदात्त धोरणामुळे इतर भाषांतील अनेक शब्दही मराठीत सामावले गेले आहेत आणि त्यामुळे ही भाषा अधिक प्रगल्भ झाली आहे.”
धामनेकर यांनी लीळाचरित्र, विवेक सिंधू यासारख्या ग्रंथांचे योगदान उलगडले आणि वारकरी संप्रदाय, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याचे महत्त्वही अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचे भोसले घराणे केवळ रणभूमीतले नव्हते; त्यांनी मराठी साहित्याच्या उन्नतीस मोठे योगदान दिले. त्यानंतर सोलापूरच्या श्रीधर स्वामी, होनाजी बाळा, विविध शाहीर, पोवाड्याद्वारे कार्य करणारे कलाकार, लावणीकार, बखरकार आणि वृत्तपत्रांनीही भाषेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच सामाजिक नाटकांनी मराठी भाषेला अभिवृद्धी दिली. बेळगावकरांनी विविध क्षेत्रात जी माणसे दिली, त्यांनीही मराठी भाषेला समृद्ध करण्यास हातभार लावला, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात सुनिता मोहिते यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर अध्यक्ष अनंत लाड यांनी धामणेकर यांचा परिचय करून त्यांचा सन्मान केला. उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी नेताजी जाधव व इतर संचालक, कर्मचारी तसेच निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारच्या कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण कॉलेज हलकर्णी चे प्रा. संदीप मुंगारे मराठी साहित्यावर आपले विचार मांडणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.