बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात प्रथमच मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘शिवप्रताप दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विचार मांडताना शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे प्रमुख आणि माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी सांगितले की, प्रतापगडातील लढाईत छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर येणारा धोका कसा संपवायचा याचे सामर्थ्यपूर्ण उदाहरण घालून दिले. सर्व हिंदूंनी जात, भाषा आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रतापगडावर अफजलखानाचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न कसे उधळून लावले गेले याची ऐतिहासिक माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमात आयोजक धनंजय जाधव, दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले आणि बेळगावचे महापौर मंगेश पवार यांनीही आपले विचार मांडले. मंचावर माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, युवराज जाधव आणि चव्हाट गल्लीतील मोहन किल्लेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सांबरा येथील भाजपा नेते विक्रम सोनजी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अफजलखान वधाचा आकर्षक जिवंत देखावा सादर करून झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक राजू भातकांडे, शरद पाटील, नारायण पाटील, संजय गुंडकल, सत्यम नाईक आणि प्रवीण महेंद्रकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन संतोष जैनोजी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवभक्त माता-भगिनी उपस्थित होत्या.