बेळगाव / प्रतिनिधी
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे इन्फंट्री डे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना शरकत वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमास मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, जूनियर लीडर्स विंगचे कमांडंट मेजर जनरल राकेश मनोच्या तसेच विविध लष्करी अधिकारी, जवान आणि सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी इन्फंट्री डे साजरा केला जातो. या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली जाते. यावर्षीही पारंपरिक शिस्त आणि सन्मानाने हा कार्यक्रम पार पडला.

शरकत वॉर मेमोरियल येथे ब्रिगेडियर मुखर्जी आणि मेजर जनरल मनोच्या यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीरांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, जवान आणि निवृत्त सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना विनम्र अभिवादन केले.








