खानापूर / प्रतिनिधी
उद्यमबाग बेळगाव येथून कामावरून घरी परतत असताना बेळगाव – गोवा महामार्गावर असलेल्या मलप्रभा नदीवरील पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी महामार्गानजीक असलेल्या भिंतीवर धडकली. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. शनिवार (१४ जून) रोजी सायंकाळी ६ वा. दरम्यान ही घडली आहे. परशराम गोविंद बेळगावकर (रा. भातकांडे गल्ली; नंदगड ता. खानापूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, परशराम गोविंद बेळगावकर (रा. भातकांडे गल्ली; नंदगड ता. खानापूर) हे उद्यमबाग बेळगाव येथील एका कारखान्यात कामाला होते. दररोज कामानिमित्त दुचाकीवरून ते ये – जा प्रवास करत होते. आज नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून आपल्या गावी नंदगडकडे जात असताना खानापूर शहरापासूननजीक असलेल्या बेळगाव – गोवा महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीवर धडकली. ही धडक इतकी जोराची होती की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पाठीमागे बसलेला युवक अमोल सिताराम अष्टेकर (वय २० वर्ष रा. बोंद्रे गल्ली नंदगड ; ता. खानापूर) हा गंभीर जखमी झाला. मृत परशराम बेळगावकर यांचा हॉटेल व्यवसाय आहे, मात्र ते उद्यमबाग येथे कामाला जात असल्याने, सध्या हॉटेल व्यवसाय त्यांचे वडील सांभाळत होते.
उद्या रविवार (दि. १५) जून रोजी सकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर नंदगड या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.