बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात मालमत्ता नोंदणीच्या प्रक्रियेत होणारी फसवणूक, बनावट व्यवहार व तोतयागिरीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मालमत्ता नोंदणी करताना आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचे आदेश दिले असून, हे आदेश तत्काळ अंमलात आले आहेत.

मालमत्तेशी संबंधित गुन्हेगारी प्रकार रोखणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयांत खरेदीदार, विक्रेते, देणगी देणारे व स्वीकारणारे अशा सर्व संबंधित व्यक्तींचे आधार-आधारित प्रमाणीकरण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या उपाययोजनेमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बळकावणाऱ्या टोळ्यांवर आळा बसेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, कुलमुखत्यारपत्राद्वारे (जीपीए) होणाऱ्या व्यवहारांसाठीही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. फक्त नोंदणीकृत जीपीएच वैध मानले जाणार असून, जीपीए देणारी व्यक्ती जिवंत असल्याचा दाखला संबंधित महसूल अधिकाऱ्याकडून सादर करणे आवश्यक राहील. या आदेशांचे उल्लंघन केल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.