बेळगाव : “पिरणवाडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गोविंदराव राऊत यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”असे विचार आज अनेक वक्त्यांनी बोलताना व्यक्त केले.
माजी महापौर आणि सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक गोविंदराव राऊत यांच्या निधनानिमित्त गुरुवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते. तर व्यासपीठावर नेताजी जाधव, मराठा मंदिराचे संचालक शिवाजी हंगिरगेकर व गोविंदराव राऊत यांचे जावई पुनाजी पाटील हे होते.
प्रारंभी अनंत लाड यांनी राऊत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विविध संस्था व व्यक्तींच्यावतीने राऊत यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अनेकांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक करून राऊत यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता आणि भगव्या ध्वजासाठी धाडसाने उभा राहणारे व्यक्तिमत्व अशा शब्दात राऊत यांचे गुणगान केले.
टिळकवाडी वाचनालयातर्फे श्रीमती विजया पुजारी, पिरणवाडी ग्रामस्थांतर्फे नारायण पाटील, मराठा मंदिरतर्फे शिवाजीराव हंगिरगेकर, माजी नगरसेवकांतर्फे अनिल पाटील, म. ए.समिती युवा आघाडी तर्फे अंकुश केसरकर, मोतेश बारदेशकर आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने डॉ. विनोद गायकवाड व अनंत लाड यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. वाचनालयाचे आठवेळा अध्यक्षपद भूषविणाऱ्या राऊत यांचा वाचनालयाची अनगोळ शाखा सुरू करण्यात आणि वाचनालयात संगीत भजन स्पर्धेसारखे अनेक उपक्रम राबविण्यात सिंहाचा वाटा होता. अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेस विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राऊत यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.