कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय तर्फे कावळेवाडी येथील प्राथमिक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने संस्थेने एकवीस हजार रुपये किमतीचे कमर्शियल आर.ओ. प्लॅन्ट देणगीत दिले असून, या यंत्राद्वारे प्रति तास ४५ लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष राजू बुरुड होते. प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापिका वैशाली कणबरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. फिल्टर मशीनला पुष्पहार व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक म्हणाले, “विद्यार्थी हा देशाचा महत्वपूर्ण घटक आहे. शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि उत्तम संस्कार म्हणजेच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा पाया. निरोगी शरीरासाठी शुद्ध पाणी आवश्यक असून शाळेतील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी संस्था सदैव तत्पर राहील.”
कार्यक्रमात नवीन प्रभारी मुख्याध्यापिका वैशाली कणबरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिभा कारंजी स्पर्धेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी हभप शिवाजी जाधव, पी. एस. मोरे, युवराज नाईक, शिक्षक एस. आर. सवदी, सौ. एन. एम. हुक्केरी, सुरेखा मोरे, निर्मला नाईक, आशा बाचीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वैशाली कणबरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. आर. सवदी यांनी केले.








