बेळगाव / प्रतिनिधी

म. ए. युवा समितीच्यावतीने रविवार दि. १५ मार्च रोजी येथील लोकमान्य रंगमंदिर येथे ‘इथे ओशाळाला मृत्यू’ या लोकप्रिय नाटकाचे दोन प्रयोग एकाच दिवशी होणार आहेत. या दोन्ही नाट्य प्रयोगातून मिळणाऱ्या नफा शैक्षणिक उपक्रमासाठी उपयोगात आणला जाणार आहे अशी माहिती, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहचविणे, युवावर्गात राष्ट्रप्रेम जागृत करणे या ध्येयाने वसंत कानेटकर लिखित आणि शिवगणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग मुंबई निर्मित इथे ओशाळला मृत्यू या ऐतिहासिक नाटकाचे दोन प्रयोग एकाच दिवशी आयोजित करण्यात आले आहेत. रविवार दिनांक १५ मार्च रोजी पहिला प्रयोग दुपारी ३ वाजता तर दुसरा प्रयोग सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या नाट्य प्रयोगाला प्रसाद मेडिकल आणि आर. एम. चौगुले असोसिएट प्रायोजक म्हणून लाभले आहेत. सदर नाट्यप्रयोग माध्यमातून मिळणारा नफा हा युवा महाराष्ट्र युवा समिती बेळगाव आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांची धगधगती शौर्यगाथा समितीच्या वतीने शैक्षणिक उपक्रमासाठी उपयोगात आणला जाणार आहे. त्यामुळे बेळगावकरांनी देणगी प्रवेशिकेद्वारे नाट्य प्रयोगाला उस्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केसरकर यांनी केले. युवा समिती सचिव श्रीकांत कदम यांनी सदर नाट्य प्रयोगाची देणगी प्रवेशिका युवा समिती कार्यालय टिळकवाडी, शिवाजी कुडुचकर ज्वेलर्स खडेबाजार शहापूर, डी. बी. पाटील फोटो स्टुडिओ बेळगाव, मसणाई ई – स्कूटर शिवाजनगर, गजानन वर्पे मच्छे आणि प्रसाद फार्मा शनिवार खुट बेळगाव येथे उपलब्ध असल्याचे सांगितले.

यावेळी नाटकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. प्रसाद फार्माचे संचालक सी. के पाटील, सुरज कुडुचकर, वासू सामजी आदी उपस्थित होते.