बेळगाव / प्रतिनिधी

महापालिकेचे विद्यमान महापौर मंगेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांचा एक वर्षांचा कार्यकाळ येत्या १४ मार्चला पूर्ण होणार आहे. मात्र, १४ मार्चला दुसरा शनिवार असून, त्या दिवशी शासकीय सुटी असल्याने त्यांचा कार्यकाळ प्रत्यक्षात १३ मार्चलाच संपणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नव्या महापौर व उपमहापौर निवडणुकीचा प्रस्ताव महापालिकेच्या कौन्सिल विभागामार्फत लवकरच प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. महापालिकेकडून प्रस्ताव पाठविण्याआधी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाशी प्राथमिक चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक आयुक्तांकडून महापौर व उपमहापौर निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यानुसार प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

दरम्यान, विद्यमान महापौर मंगेश पवार यांच्याविरोधात धारवाड खंडपीठात प्रलंबित असलेल्या याचिकेची सुनावणी येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मिळकत लपविल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर न्यायालय कोणता निर्णय देते, याकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा महापौर निवडणूक प्रक्रियेवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील वर्षी १५ मार्चला झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत मंगेश पवार यांची महापौरपदी तर वाणी जोशी यांची उपमहापौरपदी निवड झाली होती. महापालिकेत महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ केवळ एक वर्षाचा असल्याने दरवर्षी नवीन निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या निवडणुकीसाठीचा प्रस्ताव महापालिकेकडून प्रादेशिक आयुक्तांकडे पाठवला जातो. सध्या विद्यमान महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ दीड महिन्यांपेक्षा कमी राहिल्याने शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. आगामी महापौर पद सामान्य महिला प्रवर्गासाठी, तर उपमहापौर पद सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे. विद्यमान कार्यकाळात दोन्ही पदे शहराच्या दक्षिण विभागाला मिळाल्याने, पुढील वेळी महापौर व उपमहापौर पदे शहराच्या उत्तर विभागाला मिळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर विभागातील नगरसेवकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे दोन्ही पदे भाजपलाच मिळणार आहेत.