बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, ही निवडणूक १८ मार्च रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालय आणि महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
सध्याचे महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. मात्र १४ मार्च हा दुसरा शनिवार असल्यामुळे त्या दिवशी महापालिकेचे कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या दोघांच्या कामकाजाचा अखेरचा कार्यदिवस १३ मार्च ठरणार आहे. परिणामी विद्यमान महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ आता अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. महापालिकेच्या कौन्सिल विभागाने महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव फेब्रुवारीतच प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविला आहे. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेली मतदारांची यादीही प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. मात्र, अद्याप प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. बेळगाव महापालिकेत सध्या ५८ लोकनियुक्त नगरसेवक आहेत, तर पाच पदसिद्ध सदस्य आहेत. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी ६५ मतदार मतदान करणार आहेत. या सर्व मतदारांना निवडणुकीच्या आठ दिवस आधी अधिकृत नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, विद्यमान सभागृहात महापौर आणि उपमहापौर निवडणुका दरवर्षी विलंबाने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सभागृहातील पहिल्या महापौरांची निवडणूक फेब्रुवारीत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महापौरांच्या निवडणुका देखील विलंबाने झाल्या. त्यामुळे आता चौथ्या महापौरांची निवडणूक मार्च महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच पहिल्या महापौरांच्या निवडीच्या तारखेच्या तुलनेत सव्वा ते दीड महिन्यांच्या विलंबाने चौथ्या महापौरांची निवड होणार आहे. सामान्यतः विद्यमान महापौरांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, सध्याच्या सभागृहात हा संकेत पाळला गेला नसल्याचे दिसून येत आहे. प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे मानले जात आहे.








