बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचे विद्यमान महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश नगरविकास खात्याने जारी केला आहे. यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल करून या दोघांनीही खाऊ कट्टा येथे त्यांच्या पत्नींच्या नावावर स्टॉल घेतला आहे. तसेच नगरसेवक म्हणून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे अशी तक्रार सुजित मुळगुंद यांनी केली होती. प्रादेशिक आयुक्तांनी या दोघांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला होता.
तथापि, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि स्थगिती आदेश आणला. दरम्यान, मंगेश पवार यांची बेळगावचे महापौर म्हणून निवडही झाली. उच्च न्यायालयाने सरकारला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी चौकशी करून या दोघांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला. तसेच महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक २३ आणि ४१ च्या जागा रिक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.