बेंगळूर : बेळगावचे महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरवण्याच्या प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अंतिम सुनावणी सोमवारी होणार आहे.

निवडणुकीपूर्वी मंगेश पवार व जयंत जाधव यांनी आपल्या पत्नींच्या नावे खाऊ कट्ट्यात गाळे घेतल्याचे सिद्ध झाले होते. महानगरपालिकेवर निवडून आल्यानंतर ते गाळे नगरपालिकेकडे सुपूर्द करणे आवश्यक होते मात्र संबंधित नगरसेवकांनी तसे न केल्याने महानगरपालिकेचा अप्रत्यक्ष फायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी याबाबत रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कारवाई करत प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टनावर यांनी पवार व जाधव यांना अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरोधात नगरविकास विभागात पुन्हा अपील करण्यात आले होती. परंतु विभागाच्या सचिव दीपा चळवळ यांनी प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय योग्य ठरवत महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव या दोघांचीही पद रद्द करण्याचा आदेश कायम ठेवला होता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी न्यायालयाकडून स्थगिती मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांच्या पद अपात्रतेबाबत उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने तूर्तास त्यांच्या सदस्यतेवर निर्णय अमलात आणण्यात आलेला नाही त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे..