खानापूर / प्रतिनिधी
बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे आज होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली व्हॅक्सिन डेपो परिसरात घेण्यात येणार होता. यासाठी समितीने जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती आणि रविवारी पोलिसांनी तोंडी परवानगीही दिली होती.
मात्र रात्रीपासून प्रशासनाने भूमिका बदलत मेळाव्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते अडविण्याची कामे सुरू केली. त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी अचानक कारवाई करत खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, गोपाळ पाटील आणि पांडुरंग सावंत यांचा समावेश आहे. सर्वांना खानापूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याच्या हक्कावर गदा आणणारी असल्याची भावना मराठी भाषिकांमध्ये व्यक्त केली जात असून प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.







