- समितीचे खंबीर नेतृत्त्व हरपले
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष व शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे आज दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सीमाप्रश्नाशी घट्ट नाळ जोडलेले दळवी यांनी अनेक दशकांपासून महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनांना दिशा मिळाली आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सीमाभागातील प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडत संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे ते युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले होते.
दळवी यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक तसेच विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७.३० वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे सीमाभागातील एक खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.








