• २३ जोडप्यांना आणले एकत्र ; ७० कोटीहून अधिक भरपाई जाहीर
  • २४ कौटुंबिक खटले निकाली

बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २० हजारहून अधिक विविध खटले निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावेळी १६ हजार ६६५ खटले निकालात काढण्यात आले असून ७० कोटी २० लाख ७५ हजार १५९ रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे २३ जोडप्यांमध्ये समझोता करून त्यांना एकत्र आणण्यात आले असून एक प्रकरणी दुरावलेल्या मुलीला पुन्हा वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित खटले वादी व प्रतिवादींच्या समझोत्यातून निकालात काढण्यात आले. गेल्यावर्षी १५ हजारहून अधिक खटले निकालात काढण्यात आले होते. यंदा २५ हजार ७०६ प्रकरणे लोक अदालतीत दाखल झाली असली तरी त्यापैकी १६ हजार ६६५ निकालात काढण्यात आले. शेतजमिनीचे वाद, कर्ज प्रकरणे, गुन्हेगारी, अपघात यासह इतर प्रकरणांचा यामध्ये समावेश होता. प्रलंबित खटल्यांबाबत दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र बसवून तोडगा काढण्यात आला.

लोक अदालतीमध्ये २५ हजार ७०६ प्रकरणे घेण्यात आली होती. यापैकी १६ हजार ६६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून २३ जोडप्यांना पुन्हा संसार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तर ताटातूट झालेल्या एका मुलीला पुन्हा वडिलाच्या छत्रछायेखाली आणण्यात आले. असे एकूण २४ कौटुंबिक खटले निकाली काढण्यात आले. तसेच विविध प्रकरणांमुळे त्रासलेल्या नागरिकांना लोक अदालतीच्या माध्यमातून बाहेर त्यांना कायद्याच्या कचाट्यातून काढण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित खटले तातडीने निकाली काढले जातात.

यामध्ये आर्थिक खर्च येत नसून खटल्यांमुळे अनेक संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळतो. लोकअदालतीचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या व यामुळे ‘तारीख पे तारीख’ला न्यायालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. जी प्रकरणे जटिल होती ते खटले नेहमीप्रमाणे न्यायालयात चालणार असून त्यांनाही लवकरात लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न न्यायालयाकडून होणार आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना कोर्ट कचेरीतून बाहेर काढण्यात आले.