- केवळ दुचाकी – चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला
कणकुंबी / वार्ताहर
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल खचल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक रविवारी सायंकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी दिवसभर पर्यायी खचलेल्या रस्त्यावर दगड, माती टाकून कॉक्रीट घालून सदर रस्ता सोमवारी रात्री नऊनंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला केला आहे.
बेळगाव–चोर्ला–गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात बनवलेल्या पर्यायी पुलावरून चारचाकी आणि दुचाकी वाहनांना मंगळवारी सकाळपासून वाहतूक अधिकृतपणे सुरू होणार आहे. या मार्गावरील कुसमळी येथील ब्रिटिशकालीन पूल काढून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. पर्यायी पुलावर पाण्याचा निचरा होण्यासाठी दहा पाईप घालण्यात आले होते. परंतु मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मलप्रभा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने, तसेच तोराळी, देवाचीहट्टी येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने पाण्याचा प्रवाह वाढला. म्हणून दि. २५ मे पासून हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता.
बेळगाव- जांबोटी-गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूरमार्गे वळविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दहा पाईप घालून पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. परंतु रविवार दि. ८ रोजी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने दुसऱ्यांदा रस्ता खचला. रविवारी सायंकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतर मार्गे वळविली होती. सध्या रस्त्याची दुरुस्ती करून या मार्गावरून केवळ चारचाकी व दुचाकी वाहनांना मुभा दिली आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहतूक व बस वाहतूकसुद्धा बंद राहणार आहे.