- नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात
- बेळगाव – चोर्ला – गोवा रस्त्यावरील वाहतूक होणार सुरळीत
कणकुंबी / वार्ताहर
बेळगाव – चोर्ला गोव्याला जोडणारा रस्ता पुलाच्या कामामुळे वेळोवेळी बंद करण्यात येत होता. जुना फुल पाडून नव्याने उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या चार दिवसांत दुचाकी आणि चार चाकी वाहनांची वाहतूक नव्या पुलावरून सुरू होणार असून अधिकृतरित्या १ जुलै रोजी नव्या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या पुलावरून सर्व प्रकारचे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे त्यामुळे गोवा राज्याला जोडणारा हा रस्ता आता कायमचा सुरू होणार आहे.
बेळगावहून गोव्याशी जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांपैकी अतिशय महत्त्वाचा तसेच वेळेची व इंधनाची बचत करणारा बेळगाव – चोर्ला – गोवा रस्ता वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच वाहनधारक व प्रवासी वर्गाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्वी सुरल गावामुळे त्यानंतर अरुंद आणि खराब रस्त्यामुळे तर आता गेले दोन महिने कुसमळी येथील मला प्रभा नदीच्या पात्रात बनवलेल्या पर्यायी प्रस्ताव पुलामुळे चोर्ला रस्ता कायम चर्चेत राहिला आहे.
कणकुंबी पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी बनवलेला पूल आणि रस्ता गेल्या वीस दिवसांत तीन वेळा वाहून गेल्याने बेळगाव – चोर्ला – गोवा आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम झाला. जांबोटी कणकुंबी भागातील स्थानिक नागरिकांना देखील वाहतुकीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- चोर्ला ते रणकुंडये रस्त्याच्या कामाला चालना :
बेळगाव – चोर्ला – पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या ४३.५ कि. मी. रस्त्याच्या डामरीकरणाच्या कामाला ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान सुरुवात करण्यात आली. बेळगाव – चोर्ला- पणजी हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ ए. ए. बेळगाव विभागांतर्गत येत असून सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. रस्त्यासाठी सरकारकडून ५८. ९० कोटी रुपयांची निविदा मागवण्यात आली होती. त्यानुसार ३५.३० कोटी रुपयांचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. अखेर बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी २६.१३० कि. मी. ते ६९. ४८० कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे ४३ कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणापैकी चोर्ला ते बैलूर क्रॉस पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
- कुसमळी येथील ब्रिटीशकालीन पूल इतिहास जमा :
बेळगाव – गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन पूल जीर्ण व धोकादायक बनला होता. सदर पुलावरून प्रमाणापेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे पूल धोकादायक बनला होता. नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी या भागातील नागरिकांकडून वेळोवेळी केली जात होती. त्यानुसार नवीन पुलाला चालना मिळाली. नूतन पुलासाठी वेगळा निधी मंजूर नसून रस्त्याच्या डांबरीकरण आणि पुलासाठी मंजूर झालेल्या निधीतूनच मला प्रमाण नदीवरील पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. सदर ब्रिटिशकालीन जुना पूल काढून त्याच ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे आता नवीन पूल ९० मीटर लांब तर साडेपाच मीटर रुंद आहे. नवीन पुलाचे काम हाती घेण्यापूर्वी नदीत मातीचा भराव टाकून व नदीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी दहा पाईप घालून वाहतुकीसाठी पर्यायी पूल व रस्ता बनवण्यात आला होता. ब्रिटीशकालीन पुलाला सव्वाशे वर्षाचा इतिहास होता. पुलाला आठ कमानी होत्या. संपूर्ण फुल दगडामध्ये बांधकाम करण्यात आले होते.
- नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात :
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली. मे अखेरपर्यंत नवीन पुलाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराने घेतली होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्यात येणारे काम जून महिना अखेरीस पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जून महिन्याच्या 28 किंवा 29 तारखेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे अशी अट कंत्राटदाराला घालण्यात आल्याची माहि विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
- चार दिवसांत दुचाकी – चारचाकी वाहने धावणार :
येत्या दोन-चार दिवसांत दुचाकी व चारचाकी वाहनांना नवीन पुलावरून प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली असून मातीचा भराव घालून खडी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहा कमानी असलेल्या या नवीन पुलावरून 1 जुलै पूर्वीच म्हणजे येत्या दोन-चार दिवसांत दुचाकी आणि चारचाकी वाहने धावणार आहेत. तर 1 जुलैनंतर सदर पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर बेळगाव-चोर्ला- गोवा रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक अधिकृतरित्या सुरू होणार आहे.