बेळगाव / प्रतिनिधी

कुद्रेमानी गावात रामनवमीच्या मुहुर्तावर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण आणि अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

या पवित्र सोहळ्याचे अधिष्ठान ह.भ.प. बाबूराव महाराज व ह.भ.प. रामचंद्र रवळू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. मुहूर्तमेढ करण्याचा मान ह.भ.प. अरुण पुंडलिक देवण आणि ह.भ.प. तुकाराम पुंडलिक बडसकर यांना लाभला. त्यांच्या शुभहस्ते विधीवत मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले. यावेळी भजनी मंडळाने सप्रदायिक भजन सादर करून वातावरण भक्तिरसात रंगवले.

कार्यक्रमादरम्यान दोन्ही मान्यवरांनी या धार्मिक उपक्रमासाठी आर्थिक मदत दिली. त्याबद्दल त्यांचा सत्कार वर्शिलदार गावडा धोंडिबा पाटील यांच्या हस्ते ह.भ.प. अरुण देवण यांना, तसेच वर्शिलदार गुरव शिवाजी महादेव गुरव यांच्या हस्ते ह.भ.प. तुकाराम पुंडलिक बडसकर यांना टोपी, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. मंडप डेकोरेटर यल्लापा नाईक यांनाही पानविडा व श्रीफळ देण्यात आले.

यावेळी दीपक पाटील, सुरेश पाटील, नाना मारुती पाटील, बाळाराम कदम, संजय राजगोळकर, गावडू संभाजी पाटील, मधु पन्हाळकर, शंकर पाटील, रुक्माणा कागणकर, बबन गुरव, सुरेश केदारी पाटील, प्रकाश यळळूरकर, गोविंद तरवाळ, आप्पाजी नाईक, लक्ष्मण राजगोळकर यांसह गावातील ह.भ.प. सांप्रदायिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन परशराम काकतकर यांनी मानले. या सोहळ्यामुळे कुद्रेमानी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आगामी ज्ञानेश्वरी सप्ताह व हनुमान जन्मोत्सव साठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.