बेळगाव / प्रतिनिधी
कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ आयोजित २० वे साहित्य संमेलन रविवार दि. २८ डिसेंबर रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूर येथील प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांची निवड करण्यात आली आहे.
बलभीम वाचनालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांची मंगळवारी रात्री बैठक झाली. अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष उमेश गुरव होते. यावेळी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. डॉ. पोतदार यांची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
प्रा. डॉ. पोतदार हे हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण पदवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत्त असून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. कवी, लेखक, समीक्षक म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे चार कवितासंग्रह, ६ समीक्षा ग्रंथ, संपादने प्रसिद्ध आहेत.
यावेळी मंडळाचे सचिव एम. बी. गुरव, ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे, नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, महादेव गुरव, बाळाराम धामणेकर, मोहन शिंदे, शैलेश गुरव, मारुती पाटील, महेश पाटील, पी. एल. गुरव, अनंत लोहार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.








