• नदीकाठच्या भागाला पुराचा धोका

चिक्कोडी / वार्ताहर

महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्लोळ बंधाऱ्यातून कृष्णा नदीत एकूण १,०८,५०१ क्युसेक पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजपासून कर्नाटकातील कृष्णा नदीपर्यंत ८४,९१७ क्युसेक पाणी वाहत आहे. कृष्णा नदीसह दूधगंगा आणि वेदगंगा या उपनद्यांच्या पाण्याची पातळी सरासरी २ फूट वाढली आहे. पाण्याची पातळी प्रत्येक क्षणी वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुर येण्याची भीती आहे.

चिक्कोडी -निप्पाणी तालुक्यातील सर्व ८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.आज वेदगंगा नदीवरील जत्राट -भिवशी आणि अक्कोळ – सिद्धनाळ बॅरेज तुडुंब भरले आहेत. वेदगंगा नदीवरील बारवाड -कुन्नूर, भोज-शिवापूरवाडी, दूधगंगा नदीवरील करदगा-भोज, मलिकवाड – दत्तवाड , कृष्णा नदीवरील कल्लोळ – येडूर आणि मांजरी – सवदत्ती या बॅरेजना पूर आला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.