बेळगाव / प्रतिनिधी
सध्याच्या पावसामुळे खड्डे पडून अपघात प्रवण बनलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खासबाग येथील रस्त्यासह परिसरातील रस्त्यांची आज सोमवारी सकाळी नगरसेवक रवी साळुंके यांच्या पुढाकाराने डागडुजी करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
सध्याच्या पावसामुळे खासबाग येथील डॉ. आंबेडकर चौक येथील रस्ते खड्डे पडून खराब झाले होते. पावसाचे पाणी साचलेल्या या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे गेल्या काही दिवसात या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेत प्रभाग क्र. २७ चे क्रियाशील नगरसेवक रवी साळुंके यांनी तात्काळ महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून डॉ. आंबेडकर चौकातील रस्ते ताबडतोब दुरुस्त करण्याची सूचना केली. त्यानुसार आज सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगारांकडून खासबाग डाॅ. आंबेडकर चौकातील रस्त्यांवरील खड्डे हार्ड मुरूम टाकून बुजवण्याद्वारे त्यांची डागडुजी करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता सरस्वती यांच्यासह स्वतः नगरसेवक रवी साळुंके हे खड्डे बुजवण्याच्या कामावर जातीने लक्ष ठेवून होते. त्यांनी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातीलच नाहीतर परिसरातील खराब झालेल्या अन्य रस्त्यांची देखील डागडूजी करून घेतल्यामुळे स्थानिक दुकानदार व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.