बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर – खासबाग येथील ‘संडे मार्केट’मध्ये दर रविवारी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आज महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेला भेट देऊन पाहणी केली. नगरसेवक रवी साळुंखे यांनी या गंभीर समस्येकडे आयुक्तांचे लक्ष वेधत त्यांना घटनास्थळी पाचारण केले होते.

ज्यानुसार आयुक्तांनी सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करणे आणि ग्राहकांना मोकळा रस्ता उपलब्ध करून देणे, यावर आयुक्तांनी यावेळी विशेष भर दिला.

नगरसेवक रवी साळुंखे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करून या समस्येवर प्रशासकीय पातळीवरून तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार, आज मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासबाग मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी बाजारपेठेचा सविस्तर फेरफटका मारला आणि ग्राहक तसेच विक्रेत्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त कार्तिक एम. यांनी तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या. ते म्हणाले, “दर रविवारी या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. हे लक्षात घेऊन विक्रेते आणि ग्राहक या दोघांच्याही सोयीसाठी आम्ही सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.

आज आम्ही या परिसरातील ‘मार्किंग स्पेस’ आयडेंटिफाय केली आहे. विक्रेत्यांनी आता महापालिकेने आखून दिलेल्या मर्यादेतच (मार्किंगच्या आत) बसून व्यवसाय करायचा आहे, जेणेकरून रस्ता मोकळा राहील. या संदर्भात आम्ही वाहतूक पोलीस विभागाशीही चर्चा केली असून, त्यांच्या समन्वयाने ही समस्या कायमस्वरूपी मिटवण्याला आमचे प्राधान्य असेल. तात्पुरती सोय म्हणून त्वरित मार्किंगचे काम हाती घेतले जाईल” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावेळी  बोलताना नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले, मनपा आयुक्तांना बाजारपेठेतील प्रत्यक्ष स्थिती दाखवून दिली. ते म्हणाले की, “या ठिकाणी वाहतुकीची समस्या खूप गंभीर झाली आहे. गेल्या रविवारी एसीपी निकम यांनी भेट देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. महानगरपालिकेनेही यामध्ये पुढाकार घ्यावा, यासाठी मी आयुक्त कार्तिक एम. यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना येथे भेट देण्याचे आवाहन केले होते. आयुक्तांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज सर्व अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. महानगरपालिकेच्या समन्वयातून या समस्येवर योग्य तोडगा काढला जाईल आणि येथील जनतेला दिलासा मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.”

या भेटीमुळे शहापूर-खासबाग परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, नगरसेवक रवी साळुंखे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.