- नगरसेवक रवी साळुंके व एसीपी निकम यांच्याकडून संयुक्त पाहणी
बेळगाव / प्रतिनिधी
खासबाग सर्कलमधील आठवडी बाजारात वाढती गर्दी आणि सतत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. बाजारातील परिस्थिती सुधारण्यासाठी शहर सेवक रवी साळुंके आणि वाहतूक विभागाचे एसीपी निकम यांनी संयुक्तपणे बाजार परिसराची पाहणी केली.
रविवारच्या बाजारादरम्यान विक्रेत्यांचा रस्त्याच्या कडेला पसारा, नागरिकांची गैरसोय आणि त्यामुळे वाढणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. या सर्व समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना राबविल्या जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
बाजारात शिस्त राखण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याला ठरवून दिलेल्या मर्यादेतच व्यवसाय करावा लागेल. व्यापाऱ्यांसाठी निश्चित खुणा आखण्यात येणार असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा एसीपी निकम यांनी दिला.
यावेळी बोलताना नगरसेवक रवी साळुंके यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांची सुरक्षित व सोयीस्कर हालचाल तसेच सुरळीत वाहतूक यासाठी ही व्यवस्था राबविण्यात येत आहे. या नव्या नियोजनामुळे खासबाग आठवडी बाजारात लवकरच सुव्यवस्था व सुरक्षिततेचा अनुभव नागरिकांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.








