बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायावर गुन्हे अन्वेषण शाखेने (सीसीबी) धाड टाकून तिघा आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून रोकड व मटक्याच्या चिठ्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुन्या मोडका बाजार परिसरातील खंजर गल्ली येथे हा मटका अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत अशोक पवार, गजानन पाटील आणि हवण भातखांडे यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण ११ हजार १८० रुपयांची रोकड तसेच मटक्याच्या चिठ्या जप्त केल्या आहेत. चौकशीदरम्यान जमा झालेली रक्कम बेळगावमधील फहीम कोतवाल याच्याकडे पोहोचवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी चौघांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सीसीबी पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.