- ग्रामस्थांचा आरोप : प्रशासनाच्या उदासीनते विरोधात तीव्र संताप
बेळगाव / प्रतिनिधी
खादरवाडी रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेले रात्रभराचे आंदोलन शनिवारी उशिरा रात्री पोलिसांनी बंद पाडले. बेळगाव शहरातील क्लब रोडवरील ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या कार्यालयासमोर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते.
सलग तीन दिवस उपोषण सुरू असल्याने आंदोलकांची प्रकृती धोक्यात येऊ शकते, या कारणास्तव ही कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र आंदोलकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात हलविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत किंवा प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका राजेश पाटील यांनी घेतली होती. तरीही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन समस्यांवर चर्चा न केल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संताप व्यक्त केला.
दरम्यान, मध्यरात्री कारवाई करणाऱ्या कॅम्प पोलिसांनी आंदोलकांना धमकावत संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच स्थानिक आमदाराच्या भावाच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केल्याचा गंभीर दावा देखील करण्यात आला आहे.
खादरवाडी रस्त्याची दुरवस्था दीर्घकाळापासून कायम असून याचा नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. शांततापूर्ण व न्याय्य मागणी दडपण्याच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, तातडीने रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.








