कावळेवाडी : येथील भजनी मंडळ व ज्ञानेश्वर पारायण मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मूहूर्तमेढ उत्साहात रोवण्यात आली. पाच मार्च रोजी तुकाराम बीज निमित्त गावात पारायण उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याची औपचारिक सुरुवात पारंपरिक विधींनी झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर होते. समाजसेविका आरती भंडारे आणि ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते मूहूर्तमेढ पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा रेखा नाईक, संदीप अष्टेकर, बबलू नावगेकर, सौ. शीतल तारीहाळकर, सागर नाईक, शांता सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातून टाळ-मृदुंगाच्या गजरात मूहूर्तमेढीची मिरवणूक काढण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प, श्रीफळ व पानविडा देऊन स्वागत करण्यात आले. हभप मारुती बाचीकर, जोतिबा मोरे, एम. पी. मोरे, लक्ष्मण जाधव, भावकाणा गावडा, संजय ओऊळकर, नारायण गुंडू मोरे, भरमाणा मोरे, यशवंतराव मोरे, काशिनाथ मोरे, हभप गंगुबाई मोरे, आशा बाचीकर, अनिता बाचीकर, कृष्णाबाई मोरे, जिजाबाई कणबरकर, चुडापा यळूरकर, सौ. यल्लुबाई ल. जाधव, मारुती मोरे आदी माळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आरती भंडारे यांनी कर्मप्रधान जीवनाचा संदेश देत प्लास्टिकमुक्त गाव, वृक्षलागवड व संगोपन, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. संतांच्या अभंगातून समाजप्रबोधनाचा वारसा जपला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारांचा गौरव केला. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, सावता माळी, गोरा कुंभार, बंका महार, रोहिदास, कान्होपात्रा, जनाबाई आदी संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजात आनंद आणि बंधुभाव रुजवला, असे त्यांनी नमूद केले.
पारायण सोहळा गेली सलग २७ वर्षे किर्तन, प्रवचन, गोपाळकाला व दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांतून साजरा केला जात असून गावात भक्तीमय वातावरण निर्माण होते. यावेळी महात्मा गांधी सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थांकडून आर्थिक सहकार्य जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गावडे यांनी केले.








