• डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त आयोजन

बेळगाव / प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था, कावळेवाडी यांच्या वतीने मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भारताचे माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून ओळखला जातो तसेच महाराष्ट्रात ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दुहेरी औचित्याने संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा आणि वृत्तपत्र वितरकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात निवडक दहा विद्यार्थी डॉ. कलाम यांच्या जीवनावर आपले विचार मांडणार आहेत. तसेच वयाच्या बाराव्या वर्षापासून वृत्तपत्र वितरणाचे कार्य सलग ४२ वर्षांपासून करणारे राजा भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

अ‍ॅड. आर. बी. देसाई हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मनोहर बेळगावकर यांच्याहस्ते होणार आहे. या प्रसंगी हभप शिवाजी जाधव, बिजगर्णी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अ‍ॅड. नामदेव मोरे, जोतिबा मोरे, भाग्यश्री कदम, दीपा मोरे, तेजस्विनी कांबळे तसेच संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोमल गावडे, मनोहर मोरे आणि सूरज कणबरकर यांनी केले आहे.