बेळगाव : देशात घडणार्‍या ज्वलंत प्रश्नावर कवयीत्रीनी भाष्य केले आहे. केवळ निसर्ग, प्रेम यावर मर्यादीत न राहता मणिपूर, देवदासी, किन्नर असे अनेक विषय या काव्यसंग्रहात कवयित्रींनी लिलया पेलले आहेत. अशा एकूण विविध विषयाच्या ३० दर्जेदार कविता सोबतीचे पुस्तक या काव्यसंग्रहात असून मराठी साहित्य विश्वात या काव्य संग्रहाचे चांगल्या पध्दतीने स्वागत होईल असे वक्तव्य माजी प्राचार्य विचारवंत कॉ. आनंद मेणसे यांनी व्यक्त केले. कवयित्री रोशनी हुंद्रे लिखीत सोबतीचे पुस्तक या काव्यसंग्रहाचे रविवार दि. २६ रोजी महिला विद्यालय येथे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

यावेळी विचारमंचावर संपादक रमेश कोलवालकर गोवा, कवी दिग्दर्शक श्री दर्शन लोलयेकर, कॉ. कृष्णा शहापूरकर व कवयित्री रोशनी हुंद्रे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा सडेकर यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोबतीचे पुस्तक या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात झाले. त्यानंतर कवयित्री रोशनी हुंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध संघटनांच्या वतीने कवयित्री रोशनी हुंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रविराज हुंद्रे, स्वराज हुंद्रे, रणवीर हुंद्रे यांच्यासह बाग परिवार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सदस्य, प्रगतिशील लेखक संघ, तारांगण सदस्य, मैत्रेयी कलामंच तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा. डॉ. मनीषा नाडगौडा यांनी मानले.