बेळगाव : माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय..
सौ. शकुंतला अनिल बिरजे हिचा जन्म १९५४ मध्ये गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पार्वती व शंकरराव ईराप्पा पाटील यांच्या पोटी झाला. तिचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा क्रमांक १५ मध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण शहापूर येथील सरस्वती गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केले. तिने राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातून बी. ए. पदवी संपादित केली. वयाच्या १९ व्या वर्षीच तिने बी. ए. पदवी संपादन करण्याचा मान मिळवला. तिला अभ्यासाची फार आवड होती. त्यामुळे तिने अल्पावधीत आपले शिक्षण पूर्ण केले.

१९७४ मध्ये तिचा माझ्याशी विवाह झाला आणि तिच्या सांसारिक आणि सामाजिक कार्याला गती मिळाली. १९९५ मध्ये तिची आदर्श को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. पुढे तिला महाराष्ट्र एकीकरण समितीने महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी तिकिट दिले. त्यामुळे १९९६ साली ती नगरसेविका म्हणून निवडून आली. १९९६ ते २००१ सालापर्यंत नगरसेविका असताना तिने सामान्य लोकांची अनेक कामे केली. समाजसेवेत हिरिरीने भाग घेत असताना तिने कधीही घराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मी कामानिमित्त बाहेरगावी असलो तरी शकुंतलाने तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. आम्हा उभयतांच्या दूरदृष्टीमुळे मुलगी डेंटल सर्जन झाली. दोन्ही मुले इंजिनिअर झाली. नाती – गोती सांभाळून शकुंतलाने घराचे गोकूळ केले. सर्वांना आपुलकीची आणि सन्मानाची वागणूक तिने दिली. तिला बागकामाचीही फार आवड होती. मुलाप्रमाणेच झाडावरही ती प्रेम करायची. अशी माझी मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष पत्नी सौ. शकुंतला बिरजे हिच्या निधनामुळे आमच्या बिरजे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • श्री. अनिल दत्ताजी बिरजे (पती) भाग्यनगर , बेळगाव.