- बसवराज होरट्टींचा राजीनामा ; सभापतीपदासाठी हालचालींना वेग
बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या ए. व्ही. गायत्री शांतेगौडा यांनी शुक्रवारी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांच्या दालनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
शपथविधी कार्यक्रमाला केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, मंत्री नरेंद्रस्वामी, विधान परिषदेचे सरकारी मुख्य सचेतक सलीम अहमद, आमदार प्रकाश कोळीवाड, तसेच सदस्य एस. रवी, आयव्हन डिसूझा, एच. पी. सुधामदास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सुरुवातीला त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली होती.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होरट्टी यांनी यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तत्काळ राजीनामा सादर केला. आपल्या राजीनामा पत्रात हा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नवीन सभापतीची निवड होईपर्यंत बसवराज होरट्टी हंगामी सभापती म्हणून कामकाज पाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








