- मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती
मुंबई / प्रतिनिधी
कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदीकाठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे पत्र पाठविले आहे. या पत्रात अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर, नदीमधील गाळ साचणे, बंधाऱ्यांचे बांधकाम यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिसरातील नागरिकांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याकडे सोपविले आहे. या अभ्यासातून परिस्थितीबाबतचा साद्यंत माहिती समजून घेता येणार आहे. याबाबतच आहेत. अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही, तोवर या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय विवेकी ठरणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.