बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या राष्ट्रीय सहकोषाध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल नितीन कपिलेश्वरकर व मंडळाच्या विभागीय कार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल परशराम माळी यांचा येथील प्रगतिशील लेखक संघातर्फे शुक्रवारी सत्कार करण्यात आला. अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.

प्रगतिशीलच्या साप्ताहिक बैठकीत हा सत्कार झाला. यावेळी प्रा. दत्ता नाडगौडा यांनी मदन पाटील यांच्या अकथित सावरकर या पुस्तकावर आपले विचार मांडले. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी त्यांनी संघाच्या उपक्रमांची माहिती दिली.

प्रा. नाडगौडा यांनी अकथित सावरकर या पुस्तकावर बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वीचे सावरकर व स्वातंत्र्यानंतरचे सावरकर अशा दोन विभागात हे पुस्तक विभागले आहे. स्वातंत्र्यापूर्वी सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. पण स्वातंत्र्यानंतर ते अहंमन्य बनले. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी ते अनेकदा खोटेपणाने वागले. हे या पुस्तकात काही प्रसंगातून लेखकाने स्पष्ट केले आहे. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी कुणी दिली नसून त्यांनी ती स्वतःच लावून घेतली आहे. महात्मा गांधी एका कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आले असताना आपण आजारी आहोत. त्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकलो नाही असे सावरकर यांनी खोटेच सांगितले. ते आजारी असल्याने महात्मा गांधी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्यासमवेत आप्पासाहेब पटवर्धन होते. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात गांधीजींनी सावरकर यांच्या भेटीत त्यांच्या पत्नीच्या पायावर डोके ठेवले व तुम्ही पदरात धगधगता अंगार ठेवून घेतला आहात. धन्य आहात तुम्ही असे म्हटले, अशी बातमी आली. ही बातमी सावरकर यांनी स्वतःच लिहून वृत्तपत्रांना पाठविली होती. त्यांच्या खोटेपणाचे इतरही काही प्रसंग या पुस्तकात आहेत. लेखकाने निःपक्षपातीपणे लिखाण केले असून हे पुस्तक वाचनीय आहे असे त्यांनी सांगितले.

यानंतर नितीन कपिलेश्वरकर यांचा लेखक संघाचे कार्यवाह कृष्णा शहापूरकर व परशराम माळी यांचा उपाध्यक्ष अनिल आजगावकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नितीन कपिलेश्वरकर यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्राबाहेर देशात व परदेशातही मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बृहन्महाराष्ट्र मंडळ करीत आहे, असे त्यांनी सांगितले. अनिल आजगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.