• सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कन्नडसक्ती थांबविण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला सीमाप्रश्नाचा वाद मिटत नाही तोपर्यंत बेळगाव सीमावर्ती भागात कन्नड भाषा अनिवार्य करू नये जैसे थे स्थिती राखावी, या मागणीसाठी आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि शिवसेनेच्यावतीने बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. याशिवाय संविधानातील तरतुदींनुसार, जेव्हा ४० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त इतर भाषिक असतात, तेव्हा त्यांच्या भाषेलाही प्राधान्य दिले पाहिजे. तेव्हा सीमावाद मिटल्याशिवाय सीमावर्ती भागात कन्नड सक्तीचे धोरण लागू करू नये अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके म्हणाले की, कन्नड प्राधिकरणाने सरकारी कार्यालयांमध्ये १०० टक्के कन्नड भाषा वापरण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, बेळगाव हा एक सीमावर्ती जिल्हा आहे आणि तिथे मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. गेल्या ७० वर्षांपासून सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. परिस्थिती जैसे थे राहावी असे न्यायालयाने म्हटले असले तरी, कन्नड प्राधिकरणाने कन्नड भाषा अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक राज्याने आपल्या भाषेचा आदर करणे स्वाभाविक आहे. तथापि, सीमावर्ती भागात, जिथे बहुतेक लोक मराठी भाषिक आहेत, कन्नड भाषा अनिवार्य करणे योग्य नाही. आम्ही यापूर्वी कधीही कन्नड भाषेला विरोध केला नाही. अजूनही आमचा विरोध नाही. संपूर्ण कर्नाटकात कन्नड भाषा अनिवार्य करण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सीमावाद मिटत नाही तोपर्यंत सीमावर्ती भागात जैसे थे स्थिती कायम ठेवावी आणि कन्नड अनिवार्य करण्याचा आदेश मागे घ्यावा ,अशी मागणी त्यांनी केली.

निवेदन स्वीकारून महापौर मंगेश पवार यांनी , कन्नडसक्तीच्या धोरणाबाबत कायद्याच्या चौकटीत पावले उचलली जातील आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, महेश टकसाळी, राजकुमार बोकडे, माजी महापौर महेन नाईक, माजी नगरसेवक दिलीप बैलकर, शिवाजी हावळाण्णाचे, महादेव पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक घगवे,बेळगाव युवा सेनेचे विनायक हुलजी विद्येश बडसकर, सक्षम कंग्राळकर, प्रकाश हेब्बाजी, रमेश माळवी,सागर कणबरकर, महेंद्र जाधव, जोतिबा येळ्ळूरकर, सुधीर शिरोळे, बाबू पावशे, मोतेश बार्देशकर, विजय सांबरेकर, राजू पाटील, सुरज जाधव, सुरज पेडणेकर, अकाश कडेमनी, अशोक सुभेदार, विनायक पवार, राजू पाटील, विनायक मजुकर श्रीकांत नांदुरकर, अनिल देसूरकर,राजू पावले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.