बेळगाव : महात्मा फुले यांचे कार्य दलित,विधवा, शाळा शेतकरी यांच्या इतपतच मर्यादित नव्हते तर, त्यांनी कामगार चळवळीत मोलाचे योगदान दिले होते, असे प्रतिपादन बेळगावचे ज्येष्ठ विचारवंत प्रा आनंद मेणसे यांनी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या संयुक्त कार्यक्रमात बोलताना केले.
काल शुक्रवारी सायंकाळी रामदेव गल्ली येथील शहिद भगतसिंग सभागृह आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड नागेश सातेरी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे उपस्थित होते.यावेळी महात्मा फुले यांचे कामगार चळवळीतील योगदान या विषयावर पुढे बोलताना प्रा.मेणसे म्हणाले, जेम्स व्हेटने लावलेल्या वाफेच्या शोधा नंतर जगात अमुलाग्र बदल घडले. वाफेच्या शोधा नंतर जगात यंत्र युगाचा प्रारंभ झाला. व्यापारी उद्योजक बनले. स्वतःच्या हितासाठी उद्योजक संघटित झाले. उद्योगासाठी कामगारांची गरज भासू लागली. कामगारांच्या श्रमावर उद्योजकांनी गडगंज संपत्ती कमावली. मात्र दुसऱ्या बाजूला कामगार साध्या साध्या सुखसुविधानापासूनही वंचित राहू लागले.
1860 ते 1890 दरम्यान दुष्काळ काळात ग्रामीण भागातील लोक कामासाठी मुंबईत आले. 1854 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरुवात झाली 875 मध्ये गिरणी कामगारांनी स्वतःच्या हितासाठी मिल कॉर्नर असोसिएशनची स्थापना केली. या काळात रात्रंदिवस काम करणाऱ्या कामगारांसाठी कोणतेच कायदे नव्हते कोणत्याच सोयी सुविधा अथवा आठवड्याची सुट्टी ही नव्हती. हा कालखंड महात्मा फुलेंच्या कार्याचा टप्पा होता. महात्मा फुले यांचे अनुयायी नारायण लोखंडे यांना गिरणी कामगारांच्या व्यथा वेदनांची पुरेपूर जाणीव होती.
महात्मा फुले आणि नारायण लोखंडे यांनी महाराष्ट्र नाभिकांची पहिली संघटना बांधली. महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनानुसार लोखंडे यांनी कामगार चळवळीला बळ देण्याचे काम हाती घेतले त्यांच्या कार्याला पत्रकार भालेकरांची साथ लाभली भालेकर यांनी दीनबंधू या वर्तमानपत्रातून कामगारांच्या दयनीय परिस्थितीची बाजू सातत्याने मांडली. इतिहासकार कृष्णराव केळुस्कर ही कामगार चळवळीत सहभागी झाले. कामगारांच्या व्यथा वेदनांची जाणीव ठेवून कामगारांच्या हिताच्या दृष्टीने गिरणी कामगारांसमोर पगार वेळेवर मिळावा महिलांसाठी प्रसाधनगृह उपलब्ध व्हावे जीवनाची सुट्टी मिळावी जखमी कामगारांना त्याचबरोबर काम करताना दूध पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी पेन्शन मिळावी आठवडायची एक दिवस सुट्टी मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांसाठी कामगार आणि मालकात सुरू झालेल्या वाटाघाटींना जातीय स्वरूप देण्याचाही प्रयत्न झाला. जातीय दंगलीत कामगारांचे बळी गेले. कामगारात फूट पडण्याचे प्रयत्न झाले.
कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी तब्बल दहा वर्ष संघर्ष केला. मुंबईतील ७३ गिरण्यांमध्ये कामगारांमध्ये जनजागृती करण्यात आली. हिंदू मुस्लिम ऐक्याचे मेळावे घेण्यात आले.सभा घेण्यात आल्या. सामाजिक सलोख्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातून जातीय दंगलीत बिथरलेले कामगार पुन्हा संघटित झाले. संघटित झालेल्या कामगार चळवळीने गिरणी मालकांना संपाचा इशारा दिला.संपाचा इशारा गिरणी कामगारांना परवडणारा नव्हता. त्यामुळेच गिरणी मालकांना कामगारांची आठवड्याची सुट्टी मान्य करावी लागली. संघटित चळवळीच्या जोरावर कामगारांच्या मागण्या मान्य होऊ लागल्या.कामगार चळवळीची स्थापना झाल्यापासून कधीही वैयक्तिक स्वार्थाचा विचार झाला नाही. कामगार चळवळीने कामगारांच्या हिताबरोबरच समाज हिताचा विचार केला. असेही प्रा. मेणसे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी म.ए. समितीचे दिवंगत नेते टी. के. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित त्यांच्या स्वागत आणि प्रास्ताविक कृष्णा शहापूरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल आजगावकर यांनी केले.








