- कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन
खानापूर : येत्या १ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून खानापूर शहरातील शिवस्मारक परिसर, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, भाजी मार्केट आणि परिसरातील विविध ठिकाणी पत्रकांचे वाटप करण्यात आले.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर करून सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी, या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचे आवाहन समितीने केले आहे. या दिवशी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी आपले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगाव, निपाणी, कारवार, खानापूरसह सीमाभागातील मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. यामुळे सुमारे ४० लाख मराठी भाषिकांवर अन्याय झाल्याची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने मांडली आहे. हा अन्याय दूर व्हावा यासाठी गेल्या अनेक दशकांपासून लोकशाही मार्गाने आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह आणि विविध माध्यमांतून लढा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनेही या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला असून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी भाषिकांनी आपले ऐक्य कायम ठेवावे, असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.
- शिवस्मारक येथे धरणे आंदोलन :
रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी खानापूर येथील राजा छत्रपती शिवस्मारक, कै. व्ही. वाय. चव्हाण माजी आमदार सभागृह येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
- समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग :
पत्रक वाटप आणि जनजागृती मोहिमेदरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजीव पाटील, उपखजिनदार तुकाराम सावंत यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, समितीचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी भाषिकांनी एकजुटीने पुढे येऊन काळा दिन गांभीर्याने पाळावा आणि धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.







