बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहापूर विभागाच्या वतीने जनजागृती बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेदरम्यान मराठीबहुल सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षी काळा दिन पाळण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर शहापूर विभाग समितीने कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काळ्या दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या बैठकीत शहापूर समितीचे ज्येष्ठ नेते नेताजी जाधव आणि समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राजकुमार बोकडे, अभिजीत मजुकर आणि गजानन शहापूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला परशराम शिंदोळकर, शिवाजी उचगावकर, कृणाल कोचेरी, दीपक तुळसकर, राहुल बोकडे, रजत बोकडे, आकाश मठवाले, राजू नेसरीकर, रवी जाधव, दीपक गौंडडकर आणि रवि पवार यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीची प्रस्तावना रणजीत हावळानाचे यांनी केली, तर आभारही त्यांनीच मानले. आगामी काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांमध्ये जनजागृती करून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








