- पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी
राणी चन्नम्मा लघु प्राणिसंग्रहालयात तब्बल ३१ काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या मृत्यूंच्या मागचे नेमके कारण शोधण्यासाठी कठोर तपास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुवेंपुनगर येथे प्राणीसंग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मंत्री जारकीहोळी यांनी या प्रकरणाबाबत विस्तृत चर्चा केली. बैठकीदरम्यान त्यांनी वन विभागाच्या डीएफओ आणि आरएफओ यांच्याकडून काळविटांच्या मृत्यूशी संबंधित सर्व अहवाल आणि प्राथमिक निष्कर्षांची माहिती मागवली.
मंत्री जारकीहोळी म्हणाले, “३१ काळविटांचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. या गूढ मृत्यूंच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल, पारदर्शक आणि तातडीने तपासणी करण्यात यावी.” प्राथमिक तपासणीनुसार, मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत असली तरी, त्यामागे मानवी निष्काळजीपणा अथवा गैरव्यवस्थापनासंबंधी काही आरोप देखील समोर येत आहेत. या सर्व मुद्द्यांची चौकशी अत्यंत गांभीर्याने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री जारकीहोळी यांनी पुढे सांगितले “काळविटांच्या मृत्यूला जबाबदार ठरणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच प्राणीसंग्रहालयातील उर्वरित काळविटांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय तात्काळ करण्यात यावेत.”
या बैठकीत प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनातील त्रुटी, प्राण्यांच्या देखरेखीची पद्धत, औषधोपचार, तसेच स्वच्छतेच्या बाबींचाही आढावा घेण्यात आला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी स्वतंत्र निरीक्षण समिती गठित करण्याबाबतही चर्चा झाली.
बैठकीच्या वेळी प्राणीसंग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी, वन विभागाचे डीएफओ, आरएफओ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.








