• लाखोंचे नुकसान ; स्वतंत्र अग्निशमन केंद्राची ग्रामस्थांची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावजवळील काकती गावात महामार्गालगत असलेल्या एका दुचाकी गॅरेजला अचानक भीषण आग लागून सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाढत्या काकती गावासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र नसल्यानेच मोठे नुकसान झाल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, काकती गावात महामार्गालगत असलेल्या विक्रम आनंदाचे यांच्या दुचाकी गॅरेजला अचानक आग लागली.  विक्रम यांनी कर्ज काढून हे गॅरेज सुरू केले होते आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. अचानक लागलेल्या आगीत गॅरेजमधील साहित्य व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आगीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गजानन गव्हाणे यांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली. या प्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, काकती गावात यावर्षी आगीची ही तिसरी घटना असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रे व पंचतारांकित हॉटेल्समुळे गावाची झपाट्याने वाढ होत असताना आपत्कालीन सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. शहरातून अग्निशमन दल पोहोचेपर्यंत मोठे नुकसान होते, त्यामुळे काकतीमध्ये तातडीने स्वतंत्र अग्निशमन केंद्र स्थापन करावे, तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.