बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील काकती गावात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत महिलेसह सात ते आठ जणांना चावा घेतल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शास्त्रीनगर भागात सकाळच्या सुमारास संबंधित कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ले चढवले. मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला कुत्र्याने लक्ष्य केले. तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या गल्लीतील अन्य ४ ते ५ जणांनाही कुत्र्याने चावा घेतला. या घटनेत एकूण ७ ते ८ जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच समाजसेवक गजानन गव्हाणे व सुनीता गव्हाणे यांनी ग्रामपंचायत पीडीओ रेवती शिगंगे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरुणांच्या मदतीने पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यात आले.

काकती गावात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. यापूर्वी ग्रामपंचायत, वनविभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदने देऊनही ठोस उपाययोजना झालेली नाही, असा आरोप गजानन गव्हाणे यांनी केला. वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित कुत्र्याला पकडण्यात आले असून योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे पीडीओ रेवती शिगंगे यांनी स्पष्ट केले. कुत्रा जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.