• उचवडेच्या युवकाला अटक : सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

मंडोळी (ता. बेळगाव) येथे गेल्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या काजू फॅक्टरीतील चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. उचवडे (ता. खानापूर) येथील एका युवकाला अटक करून २ हजार २४९ किलो काजू त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले अशोक लेलँड कंपनीचे गुड्स वाहन असा सव्वासात लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. महादेव तुकाराम पाटील (वय ३०) राहणार उचवडे असे त्याचे नाव आहे.

चोरलेल्या काजूची विक्री करताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याजवळून ४२ पोती काजूसह लाकूड कापणारी मशीन, ताडपत्री, केए २२ सी ९३८७ क्रमांकाचे अशोक लेलँड कंपनीचे गुड्स वाहन जप्त करण्यात आले आहे. केवळ चार-पाच दिवसांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, संतोष दळवाई, श्वेता, हवालदार एस. व्ही. नायकवाड, सी. एस. सिंगारी, एस. बी. उप्पार, एम. बी. कोटबागी, एम. एम. नाईक, एस. एस. हंचिनमनी, बी. एस. पडनाड, आनंद कोटगी, शिवशंकर, ए. एम. रुपनवर व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आदींनी ही कारवाई केली आहे. मंडोळी येथील बाळासाहेब कृष्णा पाटील यांच्या काजू फॅक्टरीत चोरीची घटना घडली होती. शनिवार दि. ५ जुलै रोजी ही घटना घडली होती. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल केला होता. बुधवारी बामणवाडी नाक्याजवळ ४२ पोती काजू घेऊन जाणारा टेम्पो आढळला. टेम्पो अडवून चालकाची चौकशी केली असता हा साठा मंडोळी येथून चोरल्याचे उघडकीस आले. त्यामुळे महादेव तुकाराम पाटील याला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.