बेळगाव / प्रतिनिधी
कडोलीसह चलेवनहट्टी, केदनुर, होनगा, आंबेवाडी, आलतगा आदी परिसरातील बांधकाम कामगारांसाठी युनियनची स्थापना करण्यात येत असून त्याचा उद्घाटन सोहळा रविवार, २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून मोठ्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने कामगारांना विविध शासकीय योजना, विशेषतः पेन्शन योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. १८ ते ४० वयोगटातील कामगार व त्यांच्या वारसदारांसाठी लागू असलेल्या लाभांविषयी माहिती देण्यात येणार असल्याने हा कार्यक्रम कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमाला बेळगाव कामगार जिल्हा अध्यक्ष एन. आर. लातूर, ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर, माजी तालुका पंचायत सदस्य उदय सिध्दनव्वर तसेच कामगार विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमामुळे परिसरातील बांधकाम कामगारांचे संघटन बळकट होऊन त्यांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








