बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी आणि रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी (दि. ४) रोजी घेण्यात आला. कचेरी गल्लीतील रस्त्यावरून भडकल गल्लीपर्यंत एकेरी (वन-वे) वाहतुकीबाबत महत्त्वाची घोषणा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली. त्यामुळे या भागामधील वाहतूक कोंडी सुटेल आणि सुरळीत वाहतुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

  • वाहतुकीसाठी नवीन मार्गव्यवस्था लागू :

पोलिस आयुक्त बोरसे यांनी बजाविलेल्या वाहतूक विभागाच्या आदेशानुसार, कचेरी गल्ली रस्त्यावरून शनिवार खुटमार्गे भडकल गल्ली क्रॉसपर्यंत ये-जा करणाऱ्या वाहनांपैकी चारचाकी आणि तीनचाकी वाहनांना शनिवार खुटहून भडकल गल्लीला जाता येणार आहे. मात्र, भडकल गल्लीहून शनिवार खुटकडे येता येणार नाही. मात्र, हा नियम दुचाकी वाहनांना नाही. दुचाकींना दोन्ही दिशेने ये-जा करण्यासाठी मुभा असणार आहे.

  • वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा :

कचेरी गल्ली परिसर व्यापारी आणि शासकीय कार्यालयांचा केंद्रबिंदू असल्याने येथे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. खासकरून शनिवारी आणि सोमवारी रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे हा रस्ता एकेरी केल्यास वाहतूक सुरळीत होईल. अपघातांची शक्यता कमी होईल आणि आपत्कालीन सेवांना जलद मार्ग मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. यामुळे त्याचा अभ्यास करून एकेरी वाहतूक घोषित केली आहे. नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी रस्त्यावर तैनात राहून वाहनचालकांना मार्गदर्शन करतील. नागरिकांना गोंधळ होऊ नये म्हणून रस्त्यांवर नवीन दिशादर्शक फलक, माहिती फलक लावले जातील.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे पाऊल आवश्यक होते. त्यानुसार निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे येथे थोडा त्रास होऊ शकतो. पण, सर्वांना माहिती झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.

  • एक नजर :
  • फक्त चारचाकी व तीनचाकी वाहनांसाठी एकेरीचे लागू
  • दुचाकींना दोन्ही दिशेने ये-जा करण्यासाठी मिळणार मुभा
  • सुरुवातीच्या काळात मार्गावर वाहतूक पोलिस तैनात
  • मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार
  • वाहतूक नियोजनांत सुधारणा : 

वाहतूक विभागाने अलीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून सुगम वाहतूक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर एकल मार्ग, पार्किंग झोन व सिग्नल समन्वय प्रणाली लागू करण्याची योजना आहे. नवीन बदलांमुळे शहरामधील नागरिकांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जलद वाहतुकीचा अनुभव मिळेल, असा विश्वास आहे.